आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना व करार
• विसाव्या शतकात जगभरातील विविध देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने व्यापाराचे धोरण ठरवले. हे धोरण ठरवताना काही देशांनी अवास्तव नियमे लाटून आयातीवर बंधने घातल्याने जागतिक व्यापार ठप्प झाला यामुळे जागतिक व्यापारासाठी आणि स्थैर्यासाठी काही विद्वान, राजकीय नेते, अर्थतज्ज्ञ यांनी काही जागतिक संघटनांची कल्पना मांडली. यातूनच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना इ. सारख्या संघटना स्थापन झाल्या.
गॅट (GATT) -
• जागतिक व्यापार सुरळीत चालण्यासाठी देशादेशांमधील अडथळे दूर करुन सर्व समावेशक असे धोरण ठरवण्यासाठी जगातील काही देश एकत्र येऊन हा करार झाला. या करारावर 30 ऑक्टोबर 1947 रोजी 23 देशांनी स्वाक्षरी करुन हा करार 1 जानेवारी 1948 ला अंमलात आणण्यात आला. जागतिक खुल्या व्यापाराचे वातावरण निर्माण करणे हा गॅटचा उद्देश होता. या संदर्भात आठ बैठका होऊन जागतिक व्यापार संघटना ऊरुग्वे बैठकीनंतर 1 जानेवारी 1995 पासून स्थापन होऊन कार्यान्वित झाली, भारत हा या संघटनेचा संस्थापक सदस्य असून WTO ही संघटना गॅटच्या तुलनेत व्यापक ठरलेली आहे.
सार्क संघटना (SAARC) -
• दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (South Asian Association for Regional Co-operation) ही एक आंतरराष्ट्रीय संघटना असून यामध्ये दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव आणि अफगाणिस्तान यांचा समावेश होतो. 2007 मध्ये अफगाणिस्तानचा समावेश करण्यात आला.
• या सर्व देशांची ही एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. जगातील एकूण लोकसंख्येच्या 21% लोक सार्क देशांमध्ये राहतात. या संघटनेची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी झालेली असून काठमांडू या ठिकाणी याचे मुख्यालय आहे.
• खरे पाहता सार्क देशांमधील साधनसंपत्ती आणि लोकसंख्येचा विचार केल्यास ह्या संघटनेला तेवढी प्रगती करता आली नाही. कारण दक्षिण आशियामधील या देशांचे गुंतागुंतीचे आर्थिक व राजकीय प्रश्नांबरोबरच येथील बहुतांश लोकसंख्या गरीब असून येथे तीव्र राजकीय अस्थिरताही आहे म्हणून तर गेल्या 30 वर्षापेक्षा जास्त काळात दरवर्षी या संघटनेची शिखर परिषदा होणे अपेक्षित असताना 2015 पर्यंत फक्त 18 शिखर परिषदा झाल्या तर 2016 ची पाकिस्तानमध्ये होणारी 19 वी परिषद भारतातील उरी या दहशतवादी हल्ल्यामुळे बहिष्कृत करण्यात आली.
जागतिकीकरण (Globalization) -
• एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करुन देणे याला जागतिकीकरण असे म्हणतात. यामध्ये जागतिक व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवलाचा प्रवाह, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि प्रवास यांचा समावेश होतो.
• भारतामध्ये 1990 च्या सुमारास जागतिकीकरणाची सुरुवात झाली. भारतावर एवढे विदेशी कर्ज वाढले होते की, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संघटनांनी या अटी टाकल्या होत्या की, भारताने आपल्या अर्थ व्यवस्थेमध्ये काही धोरणात्मक बदल करुन तिला विदेशी कंपन्यांसाठी खुले केले तरच कर्जे दिली जातील, याप्रकारे भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला.
0 Comments