सजीव आणि सजीवांची लक्षणे


• शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरेंद्रिये म्हणतात. उदाहरणार्थ फुफ्फुसे, हृदय, यकृत, अन्ननलिका इत्यादी.

• शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली आणि कामे सुरळीतपणे होण्यासाठी शरीराच्या कामात सुसूत्रता असणे गरजेचे असते. शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्यांच्या कार्याचे नियंत्रण मेंदू करतो.

• हृदयाकडून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे आणि तेथून परत हृदयाकडे अशी रक्ताची ने-आण सतत सुरू असते, यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात. रक्ताभिसरण मध्ये हृदयाचे कार्य मुख्य असून रक्तवाहिन्यांमधून रक्त सतत पुढे ढकलण्यासाठी हे पंपाप्रमाणे कार्य करते.

• श्वास घेणे म्हणजे नाकाने बाहेरची हवा फुफ्फुसात घेणे. उच्छ्वास म्हणजे फुप्फुसातील हवा नाकाद्वारे बाहेर सोडणे होय. एकापाठोपाठ होणाऱ्या या क्रियांना एकत्रितपणे श्वासोच्छवास म्हणतात.

• अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकांत होणे आणि ते नंतर रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नाचे पचन असे म्हणतात. अन्नाचे पचन अन्ननलिकेमध्ये होते. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आणि मोठे आतडे असे अन्ननलिकेचे भाग असतात.


• अन्नपचनास मदत करणाऱ्या रसांना पाचकरस असे म्हणतात. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. तर स्वादुपिंड सुद्धा पचनसंस्थेतील एक महत्त्वाचा अवयव असून पाचक विकारांचा विसर्ग करतो म्हणून यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे पाचक रस लहान आतड्यात येतात.


• तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यांमध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. डाळी, मांस, दूध यांमध्ये प्रथिने अधिक असतात. भुईमूग, करडई यांसारख्या तेलबियांत स्निग्धाचे प्रमाण अधिक असून पालेभाज्यांपासून क्षार आणि जीवनसत्त्वे मिळतात.

• शरीराला लागणारे सर्व अनघटक योग्य प्रमाणात मिळतील अशा अन्नपदार्थांचा समावेश ज्या आहारात असतो त्याला चौरस आहार असे म्हणतात.


• वाढत्या वयाच्या मुला-मुलींचा आहार किंवा अन्नगरज सारखीच असते.


• संतुलित आहार न मिळाल्यामुळे काही मुले अशक्त, हडकुळी दिसतात. त्यांच्या आहारात पिष्टमय पदार्थ आणि प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते म्हणून अपुऱ्या आणि संतुलित आहारामुळे त्यांचे पोषण झालेले नसते यालाच कुपोषण असे म्हणतात.


• शरीराची वाढ, विकास तसेच नियमनासाठी मर्यादित स्वरूपात आवश्यक असलेल्या सेंद्रिय संयुगाच्या समूहाला जीवनसत्त्वे असे म्हणतात. परंतु काही जीवनसत्त्वांच्या अभावामुळे वेगवेगळे विकार होत असतात.



• आपला भारत देश विविधतेने नटलेला असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहणीमान, पेहेराव, खाद्यपदार्थ वेगवेगळे बनवले जातात, जसे- दक्षिण भारतात इडली, डोसा सारखे पदार्थ, उत्तर भारतात आलू पराठा, छोले भटूरे, तर महाराष्ट्रात झुणका भाकर, वरण-भात हे लोकांच्या आवडीचे पदार्थ आहेत.


• हरभरा, मूग, मटकी अशा कडधान्यांना मोड आल्यामुळे तर काही पदार्थांना आंबवल्यामुळे अन्नपदार्थांतील जीवनसत्त्वात वाढ होऊन त्यांची पौष्टिकता वाढते याउलट अन्नपदार्थ खूप वेळ शिजवत ठेवणे, शिजलेल्या पदार्थांतील पाणी काढून टाकणे अशामुळे पदार्थांची पौष्टिकता कमी होते.